Marathi Essay on Labor - The Social Work | मी केलेले श्रमदान मराठी निबंध लेखन

Marathi essay writing topics for school students, essay topics for class 10. I hope you’ll like this articles related to essay in Marathi on The Labor I have Done or Me Kelele Shramdan. मी केलेले श्रमदान मराठी निबंध लेखन हे विद्यार्थ्यांसाठी तसेच इतर सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे. आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…


मी केलेले श्रमदान


श्रम म्हणजे ध्येय प्राप्त करण्यासाठी व्यक्तीने शारीरिक, बौद्धिक कष्ट किंवा मेहनत घेणे होय. श्रमास काम किंवा कार्य असेही संबोधले जाते. त्याचप्रमाणे श्रमदान चा शब्दशः अर्थ म्हणजे असे दान ज्यात दाता हा स्वतः काम करतो व त्याच्या या श्रमाचा इतरांना लाभ होतो .बदलत्या वेळेनुसार श्रमदानाची संकल्पना बदलत चालली आहे व ती योग्य ही आहे . यामध्ये काही व्यक्ती व संघटना स्वतः शारीरिक श्रम करून समाजसेवा करतात किंवा शारीरिक श्रम न करता चांगल्या कामाकरिता निधी उभारून देतात व त्याचे परिणाम समाजकल्याणासाठी उपयुक्त ठरतात .

"श्रमदान" ह्या शब्दाचा वापर विनामोबदला जनकल्याणसाठी किंवा चांगल्या कामासाठी केलेले कष्ट असा होतो . अन्नदान, रक्तदानाच्या बरोबरीने श्रमदानदेखील खूप महत्त्वाचे आहे.तंत्रज्ञानाच्या युगात श्रमदानाचे अनेक वर्गीकरण झालेले आहे. शारीरिक श्रमदान, बौद्धिक श्रमदान तसेच मानवनिर्मित स्वयंचलित यंत्राद्वारे केलेले कार्य म्हणजेच श्रमदान होय.

सध्या कोरोना महामारीने जगभर धुमाकूळ घातला आहे. या संसर्गजन्य रोगाच्या अतिक्रमणामुळे संपूर्ण जगभरात मृत्यूचे तांडव सुरु आहे तर अनेक लोक नोकऱ्या ,उद्योगधंदे बंद झाल्यामुळे उपासमारीने मृत्यू पावले आहेत. ज्या लोकांना उपासमारीला सामोरे जावे लागते अशा लोकांपर्यंत अन्नदात्यांनी दान केलेले अन्न पोहचवण्याचे काम हे सुद्धा एक श्रमदान आहे असे मला वाटते. मी आणि माझ्या मित्रवर्गाने समाजकल्याणाच्या हेतूने उपासमारीने ग्रस्त असलेल्या लोकांपर्यंत पोहचायचे ठरवले.

आम्ही सगळ्यांनी सर्वप्रथम कार्यकर्त्यांकडून तसेच समाजसेवकांकडून मिळणारी देणगी आणि अन्न यांचा संग्रह केला. त्यानंतर प्रत्येक जीवनावश्यक असलेल्या जसे तांदूळ, डाळ, साखर, तेल, गहू, इ. वस्तूंचे वर्गीकरण केले. मी आणि माझ्या मित्रांनी जवळपास दोन हजार कुटुंबांपर्यंत पंधरा दिवसांचे जेवण होईल इतके समान गोळा केले होते.त्यानंतर आम्ही आपापल्या आसपासचा परिसर निवडला व तेथे गरजू असलेल्या कुटुंबांची यादी तयार केली.

"आपण स्वतः सुरक्षित तरच आपला देश सुरक्षित" हे बोधवाक्य आचरणात आणून आम्ही आमच्या सुरक्षिततेची पूर्ण तयारी केली . आवश्यक असलेल्या जसे मास्क, सानिटीझर,टिशू पेपर आदी वस्तू सोबत घेतल्या होत्या. प्रत्येकजण ठरवून दिल्याप्रमाणे आजूबाजूच्या परिसरात गरजू लोकांच्या मदतीसाठी स्वतः घरोघरी जाऊन आवश्यक असलेल्या वस्तूंचा पुरवठा करत होतो. त्याचबरोबर जनजागृतीसाठी आम्ही लोकांपर्यंत कोरोना रोगाविरुद्ध लढण्यासाठी अत्यावश्यक असलेली माहिती (लक्षणे) व स्वतःच्या बचावासाठी घेण्यात येणारी काळजी यांची माहिती सुद्धा देत होतो.

अशाप्रकारे मी आणि माझ्या मित्रवर्गाने जवळपास पाच - सहा दिवसांमध्ये दिवसरात्र मेहनत करून सुमारे दोन हजार गरजू कुटुंबांपर्यंत अन्न पोहचवले . हे कार्य करताना मनात एक वेगळाच उत्साह आणि समाधान होते. आपल्यामुळे कोणाचे तरी प्राण वाचतील ही कल्पनासुद्धा अधिक श्रम करण्यास बळ देत होती.

"श्रमदान हेच श्रेष्ठ दान" असे म्हटले जाते. अर्थात श्रमदान हे कोणत्याही प्रकारचे असो त्यांतील समाजकल्याणाची भावना अतिशय महत्वाची असते. विनामोबदला इतरांच्या सुखासाठी स्वतः केलेले परिश्रम हेच सर्वश्रेष्ठ मानले जाते.







Written by Priyanka Kumbhar

No comments