Marathi Essay on A Rainy Day, A Rainy Day Information in Marathi | पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध लेखन

Marathi essay writing topics for school students, essay topics for class 10. I hope you’ll like this articles related to essay in Marathi on A Rainy Day or Pavsalyatil ek divas. पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध लेखन हे विद्यार्थ्यांसाठी तसेच इतर सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे. आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…


पावसाळ्यातील एक दिवस


उन्हाळी सुट्टी संपली आणि आम्ही सगळे मामाच्या गावाहून मुंबईला परतलो . शाळा नुकताच सुरु झाली होती. जूनचा मध्य उजाडला होता, तरी पावसाची काही चिन्हे दिसत नव्हती. खरंतर दरवर्षी पाऊस काहीतरी नवीन घेऊन येतो . कधी श्रावणाच्या रिमझिम सरी घेऊन येतो तर कधी तो उग्र रूप धारण करतो. यंदा प्रचंड उष्णता होती. कडकडीत उन्हामुळे धरणीमाता खूप तापलेली . अक्षरशः जमिनीला भेगा पडल्या होत्या .


शहरे ,खेडेगांवे अगदी सगळीकडे पाण्याची टंचाई निर्माण झालेली . प्राणी ,पक्षी, शेतकरी सगळेच चातकासारखी पावसाच्या पहिल्या सरीची वाट बघत होते. 'येरे येरे पावसा' हे बालगीत लहान मुलांसोबत मोठेही मनातल्या मनात आळवीत होते. सगळेच आतुरतेने आकाशाकडे टक लावून बघत होते . प्रत्येकजण एकाच गोष्टीची वाट पाहत होता की , पाऊस कधी पडेल?

अखेर तो दिवस उजाडला. सकाळी मी लवकरच उठून शाळेत जायला निघालो होतो. घराबाहेर पडलो आणि नेहमीच्या रस्त्याने मित्रांसोबत गप्पागोष्टी करत आम्ही सगळे शाळेत जात होतो . तेवढ्यात एक पाण्याचा थेंब वरून माझ्या गालावर पडला . मी वर आकाशाकडे पहिले तेव्हा काळ्याभोर ढगांनी आकाशात गर्दी केली होती. सूर्यदेव दिसेनाशे झाले होते. सर्व सृष्टी काळ्याभोर ढगांमुळे सावलीखाली झाकली गेली . बघता बघता अचानक पावसाच्या पहिल्या सरी बरसू लागल्या .

पहिल्या पावसाचा आनंद घेण्यासाठी आम्हा सर्व मित्रांची पावसात भिजण्याची खूप इच्छा होती. परंतु शाळेत जायचे असल्याने आम्ही सगळ्यांनी मोह आवरला आणि एका बंद दुकानाच्या आडोश्याला जाऊन उभे राहिलो. पहिला पाऊस पाहून लहान मुलांसोबाबत मोठेही आनंदीत झाले होते. आणि सगळे रिमझिम पडणाऱ्या पावसात येऊन भिजण्याचा आनंद घेऊ लागले .मी आणि माझे मित्र रस्त्यावरची गमंत मोठ्या उत्सुकतेने न्याहाळत होतो.

सारे रस्ते जलमय झाले होते. पक्षी आनंदाने चिवचिवाट करत सगळीकडे मिरवत होते . झाडे-झुडुपे मुक्तपणे पावसाचा आनंद घेत डोलत होती. सगळीकडे मातीचा मनमोहक सुगंध दरवळला होता. रस्त्यावरचे प्राणी सुद्धा उन्हाला कंटाळून आज पावसाचा मनमोकळेपणाने आनंद लुटत होती . पावसाचे हे अविस्मरणीय चित्र पाहून कवी मंगेश पाडगावकरांचे गीत माझ्या मुखातून येऊ लागले,

पाऊस आला रे आला
धारा झेला रे झेला

झाडे झाली हिरवी गाणी
रुणझुण पैंजण पानोपानी
सुगंध ओला रे ओला
पाऊस आला रे आला

प्राणी, पक्षी,झाडे ,फळ , फुले ,माणसे अगदी सगळेजण पावसाच्या धारांमध्ये मनसोक्त बेधूंद होऊन नाचत होते.जणू संपूर्ण सृष्टी पावसाच्या सरींनी न्हाऊन निघाली होती. जिकडे तिकडे हर्षित वातावरण होते. आज शाळेत जायची इच्छाच होत नव्हती. असे वाटत होते की, पावसाच्या या सरसर सरी अंगावर झेलाव्या आणि तृप्त व्हावे. पण शाळाही महत्त्वाची आहे म्हणून शाळेत जाण्याचे टाळता येणार नव्हते . पावसाचा वेग थोडा कमी झाला तसे आम्ही सगळे शाळेत गेलो आणि शाळा सुटल्यावर मात्र नक्की भिजायचे असे ठरवले .

पहिल्या दिवसाच्या पावसानं प्रत्येकाचे हृदय फुलले.पावसाच्या आगमनाने सर्वजण आनंदी होते.आज खऱ्या अर्थाने पावसाळा सुरु झाला होता. पावसाळ्यातील असा एक दिवस माझ्या चांगलाच लक्षात राहिला आहे.







Written by Priyanka Kumbhar

No comments