Marathi Essay on My School, My School Information in Marathi | माझी शाळा मराठी निबंध लेखन

Marathi essay writing topics for school students, essay topics for class 10. I hope you’ll like this articles related to essay in Marathi on Mazi Shala. मराठी निबंध लेखन हे विद्यार्थ्यांसाठी तसेच इतर सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे. आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…


माझी शाळा


जेथे साक्षात देवी सरस्वती वास करते तेथे ज्ञानाचा अखंड सागर वाहत असतो असे पवित्र स्थान म्हणजे 'शाळा' होय. शाळा हे ज्ञानमंदिर आहे. आपल्या जीवनामध्ये आई-वडिलांनंतर असलेले श्रेष्ठ स्थान हे शाळेचे असते. प्रत्येक व्यक्तीला जीवनात यशस्वी होण्यासाठी शाळेचे सर्वांत मोठे योगदान आहे. आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला घडवण्यासाठी आई आणि शाळा यांचा खूप मोठा महत्वाचा वाटा असतो . प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्यासाठी आवश्यक मूल्ये शाळेकडूनच प्राप्त होतात .

शाळा हे ज्ञानाचे असे मंदिर आहे जेथे आपल्याला निरनिराळ्या गोष्टींची जसे शिस्तबद्धता ,प्रामाणिकता आणि समाज बांधिलकी यांची शिकवण मिळते. शाळेत आपण समाजात कसे वागावे हे शिकतो तसेच आपण स्वतःचे व्यक्तिमत्व या शाळेकडूनच घडवतो. एक सुशिक्षित व्यक्ती आणि सुसज्य राष्ट्र घडवण्याची मुख्य भूमिका शाळेची असते. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्ऱ्य आणि समाजातील जातिभेद दूर कारणासाठी महात्मा फुले हे शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना असे म्हणाले होते,

विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।

माझ्या मनात माझ्या शाळेचे सर्वोच्च श्रेष्ठ स्थान आहे . माझे अस्तित्व माझ्या शाळेने घडवले आहे. माझ्या शाळेचे नाव कै. व्दारकाबाई गणेश नाईक विद्यालय असे आहे. माझ्या शाळेचा परिसर अतिशय स्वछ आणि प्रसन्न आहे. माझ्या शाळेची इमारत तीन माजली आहे. माझ्या शाळेत पहिली ते दहावी पर्यंतचे मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यम चे वर्ग भरवले जातात .माझ्या शाळेमध्ये ग्रंथालय , संगणक कक्ष तसेच खूप मोठी प्रयोगशाळा आहे . माझ्या शाळेचा सभागृह भव्य आणि सुशोभित आहे . शाळेच्या परिसराभोवती सुंदर रंगबेरंगी फुलांची झाडे आहेत तसेच खेळण्यासाठी खूप मोठे मैदान आहे .

माझ्या शाळेचे असे प्रसन्न वातावरण मला नेहमी शाळेत येण्यासाठी उत्साही करत असे. माझ्या शाळेने मला प्रेमळ शिक्षक दिलेच त्या बरोबर संकटामध्ये साथ देणारे जिवलग मित्रही दिले. दिवसभरात जास्तीत जास्त वेळ आपण शाळेत असतो त्यामुळे शाळा हा जीवनाचा एक अविभाज्य भाग होतो. माझ्या शाळेवर माझे नितांत प्रेम आणि अपार निष्ठा आहे.

माझी शाळा माझ्या जीवनातील प्रगतीची पहिली वाटचाल आहे. माझ्या शाळेने मला खूप चांगले शिक्षण दिले. माझ्या शाळेतील शिक्षक अतिशय बुद्धिमान आणि प्रामाणिक आहेत तसेच ते मनमिळाऊ असून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भागघेण्यास ते आम्हाला खूप प्रोत्साहन देतात. अभ्यासाव्यतिरिक्त माझ्या शाळेमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम साजरे केले जातात. त्यामुळे मुलांच्या बुद्धीस चालना मिळते तसेच जिद्द, चिकाटी निर्माण होते आणि कला गुणांचा गौरव सुद्धा केला जातो. माझ्या शाळेमध्ये गुरु पौर्णिमा , पालक दिन, बालक दिन, शाळा वर्धापन दिन, गांधी जयंती, लोकमान्य टिळक जयंती,गणतंत्र दिवस, स्वातंत्र्य दिवस तसेच वार्षिक स्न्हेहसंमेलन इत्यादि सर्व साजरे केले जातात.

शाळा ही महान असते. मला माझी शाळा खूप आवडते. मला माझ्या शाळेचा फार अभिमान वाटतो. मला खूप शिकून माझ्या शाळेचे तसेच माझ्या देशाचे नाव उज्ज्वल करायचे आहे.







Written by Priyanka Kumbhar

No comments