Marathi Essay on Ganesh Chaturthi , Shree Ganesh Chaturthi Information in Marathi | श्री गणेशचतुर्थी, गणेशोत्सव मराठी निबंध लेखन




Marathi essay writing topics for school students, essay topics for class 10. I hope you’ll like this articles related to essay in Marathi on Ganesh Chaturthi. श्री गणेशचतुर्थी | गणेशोत्सव मराठी निबंध लेखन हे विद्यार्थ्यांसाठी तसेच इतर सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे. आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…


गणेशोत्सव


श्री गणशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. हिंदु धर्मीयांची आराध्य देवता म्हणजेच श्री गणेश ! श्री गणेश चतुर्थी हा भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केला जाणारा एक धार्मिक सण आहे. गणेशोत्सव मुख्यतः महाराष्ट्रात साजरा केला जाणारा मोठा उत्सव आहे. आजही हिंदु बांधव मोठया आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने घराघरांत गणेशोत्सव साजरा करतांना आपल्याला पहायला मिळतात.

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षादरम्यान गणपती म्हणजेच "गण + पती = गणपती" देवाचा जन्म झाला म्हणून गणपती बाप्पाचा जन्मदिवस म्हणून गणेश चतुर्थी साजरी केली जाते. गणपती बाप्पाची मूर्ती वाजत गाजत आणून सजवलेल्या मखरात बसवतात. श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीची आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले, पत्री, नैवेद्य इ.सोळा उपचारांनी यथासांग पूजा केली जाते. भक्तिभावाने गणपतीला दुर्वा अर्पण करून अखेर आरती करण्याची प्रथा आहे. नंतर बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवतात. या दिवसापासून गणेशोत्सवास सुरुवात होते.

अजं निर्विकल्पं निराकारमेकं
निरानान्दमानान्दं-अद्वैतापूर्णम्
परं निर्गुणं निर्विशेषं निरीहं
परब्रह्म-रूपं गणेशं भजेम ||

आदिशंकराचार्यांनी याचा अर्थ फार सुंदर रितीने सांगितला आहे. "श्रीगणेश जरी गजमुख म्हणून माहित असला तरी तो परब्रह्माचे रूप आहे. गणेशाचे वर्णन ‘अजम्, निर्विकल्पं, निराकार रूपम्’ असे केले जाते. तो अजम् आहे म्हणजेच ज्याचा जन्म झाला नाही असा, तो निराकार आहे म्हणजेच आकार रहित आहे आणि निर्विकल्प म्हणजेच विकल्प नसलेला असा आहे. तो सर्वत्र असलेल्या चेतनेचे प्रतिक आहे. गणेशामुळेच हे ब्रह्मांड आहे. ज्याच्यामुळे सर्व गोष्टींना आकार मिळतो आणि अशी ऊर्जा आहे ज्यात सारे विश्व सामावलेले आहे. "

गजमुख असलेला श्रीगणेश म्हणजे सर्व प्रकारची बुद्धीमत्ता, ऐश्वर्य आणि सौभाग्य मिळवून देणारा देव आणि शिव पार्वतीचा पुत्र आहे. गणपती बाप्पा अनेक नावांनी ओळखले जातात . सुख देणारे सुखकर्ता , संकटांचा विनाश करणारे दुःखहर्ता, सगळ्या दुःखाचे निवारण करणारे आणि जगताचे पालनकर्ता अशा विविध नावानी बाप्पाचे स्मरण केले जाते. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण मोठ्या भक्तिभावाने व आनंदाने गणपती बाप्पाची पूजा करतात.

काही लोक गणपती बाप्पाचे विसर्जन दीड दिवसाने, काही गाैरीबरोबर पाच दिवसांनी, तर काही सात दिवसांनी करतात. सार्वजनिक गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी करतात. गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी 'श्रीं' ची वाजत गाजत मिरवणूक काढतात. "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" असा गजर करतात आणि ढोल, ताशे वाजवून लेझीम खेळत-खेळत, नाचत जातात. नंतर समुद्र, नदी किंवा तलावांमध्ये गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करतात.

गणेशोत्सव हा एक अत्यंत आनंदमय आणि उल्हासदायी उत्सव आहे. गणेशाेत्सवात होणाऱ्या विविध कार्यक्रमांमुळे भक्तिभाव निर्माण होतो तसेच एकमेकांमधील प्रेम वाढते,परस्पर संबंध दृढ होतात आणि करमणूक सुद्धा होते. सामाजिक एकोपा वाढतो.

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

अर्थात श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत . ज्यांचा एक दात तुटलेला आहे आणि शरीर विशाल आहे. ज्यांचे तेज एक दशलक्ष सूर्यासारखे आहे. अशा दुःखहर्ताने आपल्या सगळ्यांच्या कार्यामध्ये येणारे विघ्न दूर करावे हीच प्रार्थना.





Written by Priyanka Kumbhar



No comments