Marathi Essay on Lal Bahadur Shastri, Lalbahadur Shastri Information in Marathi | भारतरत्न लाल बहादूर शास्त्री मराठी निबंध लेखन

 


Marathi essay writing topics for school students, essay topics for class 10. I hope you’ll like this articles related to essay in Marathi on Lal Bahadur Shastri. भारतरत्न लाल बहादूर शास्त्री मराठी निबंध लेखन हे विद्यार्थ्यांसाठी तसेच इतर सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे. आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…


भारतरत्न लाल बहादूर शास्त्री


लाल बहादूर शास्त्री हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर सेनानी, कार्यकर्ते, राष्ट्रभक्त, भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान म्हणून आपल्या सर्वांना चिरपरिचित आहेत . स्वातंत्र्याचे रक्षण आणि लोकांचे पोषण यांचे महत्व जाणून त्यांनी दिलेले ‘जय जवान जय किसान’ हे मोलाचे घोषवाक्य भारतीय जनतेच्या हृदयसिंहासनावर आजतागायत कोरले गेले आहे. 

श्री.लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोबर, इ.स. १९०४ साली उत्तर प्रदेशमधील वाराणसीपासून सात मैल दूर मुघलसराई येथे एका गरीब, प्राथमिक शिक्षकाच्या घरी झाला. त्यांच्या आईचे नाव रामदुलारी तर वडिलांचे नाव शारदाप्रसाद असे होते. ते दीड वर्षांचे होते तेव्हा त्यांचे वडील निधन पावले. त्यानंतर त्यांची आई रामदुलारी आपल्या मुलांना घेऊन माहेरी तिच्या वडिलांच्या घरी रामनगर येथे स्थायिक झाली.

शास्त्रीजींचे प्राथमिक शिक्षण मिर्झापूर येथे तर माध्यमिक शिक्षण वाराणसीला पूर्ण झाले. तेथे त्यांना निल्कामेश्वर प्रसाद नामक पितृतुल्य गुरू भेटले. त्यांनी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय यांच्या जीवनदर्शनाचे महत्त्व शास्त्रीजींना समजाविले. शिक्षण घेत असताना महात्मा गांधींच्या विचारांचा त्यांच्या मनावर सखोल परिणाम झाला. वयाच्या अकराव्या वर्षी बनारस हिंदू विश्वविद्यालयाची कोनशिला बसविण्यासाठी आलेले गांधीजी यांच्या गाजलेल्या भाषणाने ते भारावून गेले. ते महात्मा गांधींच्या असहकार विचाराने प्रभावित झाले. मग त्यांनी गांधीजींची पाठ सोडली नाही. त्यांना पुढे महात्मा गांधींचा सहवास देखील लाभला.

लालबहादूर शास्त्री लहानपणापासून अतिशय समंजस, विवेकी आणि नैतिक मुल्ये जपणारे होते. त्यांना अन्याय अजिबात सहन होत नसे. गांधीजींनी देशवासियांना असहकार चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले, त्यावेळी लाल बहादूर शास्त्री केवळ सोळा वर्षांचे होते. गांधीजींच्या आवाहनाला त्यांनी प्रतिसाद दिला. लाल बहादूर शास्त्री यांचा निर्धार ठाम होता. बाहेरुन मृदू वाटणारे शास्त्री आतून एखादया खडकासारखे कणखर होते. ब्रिटीश राजवटीच्या विरोधात स्थापन करण्यात आलेल्या अनेक राष्ट्रीय संस्थांपैकी एक वाराणसीतील काशी विद्यापीठात ते सामील झाले. पुढे त्यांनी १९२५ मध्ये काशी विद्यापीठातून तत्त्वज्ञान या विषयात 'शास्त्री' ही पदवी मिळवली.

१९२७ मध्ये लाल बहादूर शास्त्रींचा विवाह त्यांच्याच शहराजवळील मिर्झापूर येथील ललिता देवी यांच्याशी झाला. त्यांचा विवाह पारंपारिक पध्दतीने पार पडला. शास्त्रीजींनी हुंडा म्हणून एक चरखा आणि हाताने विणलेले काही मीटर कापड घेतले. यापेक्षा अधिक त्यांना आणखी काही नको होते.

१९३० मध्ये, महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा केली आणि मिठाचा कायदा मोडला. लाल बहादूर शास्त्री पेटून उठले आणि स्वातंत्र्य लढयात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. देशसेवेच्या तीव्र ओढीने लाला लजपतराय यांच्या लोकसेवेत समाजाचे ते सदस्य झाले. तेथे त्यांनी मनापासून कार्य केले. स्वातंत्रचळवळीतून त्यांना सात वेळा तुरुंगवास भोगावा लागला.त्यांनी एकूण नऊ वर्षांचा कारावास भोगला. तुरुंगवासात त्यांनी वाचन, मनन, लेखन करण्यात वेळ घालवला. १९४२ च्या चळवळीत त्यांना अटक झाली तेव्हा त्यांनी तुरुंगात कांट, हेगेल, रसेल, हक्स्ली इ. विचारवंतांचे ग्रंथ अभ्यासले. तसेच मादाम क्यूरीच्या चरित्राचे त्यांनी हिंदीत भाषांतर केले. नंतर त्यांची पं. नेहरूंशी ओळख झाली. नंतर शास्त्रीजी पंडित जवाहरलाल नेहरू बरोबर काम करू लागले. 

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस जेव्हा सत्तेवर आली, त्यापूर्वीच राष्ट्रीय संग्रामातील अनेक नेत्यांना नम्र आणि विनित लाल बहादूर शास्त्री यांचे महत्त्व लक्षात आले होते. त्यामुळे ते उत्तर प्रदेशाचे गृहमंत्री झाले. त्यानंतर ते भारताचे रेल्वेमंत्री झाले. त्यानंतर त्यांची प्रतिष्ठा निरंतर वाढतच होती. इ.स. १९६४ मध्ये पंडित नेहरूंच्या निधनानंतर लाल बहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान झाले. लाल बहादूर शास्त्री यांच्यासारख्या नेत्याने पंडीत नेहरुंनंतरची पोकळी केवळ भरुनच काढली नाही तर पाकिस्तानच्या युद्धखोरीला ‘मूँहतोड जबाब’ देऊन जागतिक राजकारणात भारताची पत आणि प्रतिष्ठा वाढविली. भारतीय राजकारणात ज्यांना मानाचा मुजरा करावा असे थोर देशभक्त म्हणजे लाल बहादूर शास्त्री होते.

पुढे भारत आणि पाकिस्तान दरम्यान रशियातील ताश्कंद येथे १० जानेवारी १९६६ रोजी आयुबखान व शास्त्री यांच्या सह्या करून शांतता करार झाला. इतकंच नाही तर या करारावर दोन्ही राष्ट्रांचे एकमत झाल्याने शास्त्रीजी खुश होते.  त्या मध्यरात्रीच म्हणजे ११ जानेवारी १९६६ रोजी लालबहादूर शास्त्री यांचं रशियातील ताश्कंद येथे हृदयविकाराने निधन झाले. 

अवघ्या ५ फूट उंचीच्या आणि किरकोळ शरीरयष्टीच्या शास्त्रीजींच्या स्वभावात जसा कणखरपणा होता तसाच कमालीचा मुत्सद्दीपणाही होता. उत्तम कार्यप्रणाली, संघटन कौशल्य त्यांच्या पूर्ण आयुष्यात दिसून येते. ते एक अव्वल दर्जाचे ज्येष्ठ राजकारणी आणि महत्त्वाकांक्षी नेते होते. शास्त्रीजींच्या वैभवशाली देशकार्याचा गौरव भारत सरकारने ‘भारतरत्न’ हा पुरस्कार देऊन त्यांचा मरणोत्तर सन्मान केला.


Written by Priyanka Kumbhar


6 comments

Amit said...

Khup sundar essay ahe

Unknown said...

Khup chhan nibandh ani mahiti apan tayar keli asun vachun chhan vatale

Quality Quotes said...

प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद

Quality Quotes said...

नमस्कार सर ! तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या वेबसाईट वरील essay वाचल्या आणि तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल सर्वप्रथम तुमचे मनःपूर्वक धन्यवाद .

Deepak sakharekar said...

Tumhi khup chhan mahiti dili. Asich mahit nehmi lokanparyant pohchavat raha.

Quality Quotes said...

नमस्कार सर ! तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या वेबसाईट वरील essay वाचल्या आणि तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल सर्वप्रथम तुमचे मनःपूर्वक धन्यवाद .